Tuesday, March 23, 2010

आजचा संस्मरणीय सायकल प्रवास


आदल्या रात्रीच ठरवून ठेवलेलं कि बस आज नक्की ठाण्याहून दादरला जायचं. गेल्या वेळेला पवईला गेलो होतो, त्या आधी घाटकोपरला जाऊन आलेलो. त्यामुळे या वेळी नक्की केलेलं कि आज दादरवर स्वारी... रात्री आईला सांगितलं, उद्या उशीर होईल... दादरला जाणार आहे... एव्हाना आईने सांगणं सोडून दिलेलं. हा काही ऐकणार नाही... कितीही सांगितलं तरी... रात्री लवकरच झोपलो साडे अकराला. निर्धार पक्का होता. उद्या सकाळी लवकर उठायचं पाच वाजता आणि साडे पाच पर्यंत निघायचं... मोबाईलवर गजर लावला पाचाचा आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी जास्त श्रम करायचे असतील तर पिष्टमय पदार्थ खावेत असं अनेक ब्लॉग्स वर वाचलेलं. त्यामुळे रात्री कधी नव्हे तो भात खाल्ला. सकाळी बरोबर पाचाला गजर झाला.. डोळ्यावर झोप कायम होती. म्हणून स्नूझ करून परत झोपलो. नऊ मिनिटांनी परत गजर झाला. या वेळेला उठलो. सकाळची आन्हिक उरकली आणि पावणे सहाला निघालो. थोडा warm up केला आणि सायकलवर स्वर झालो.
हवेत थोडासा गारवा होतं. सूर्य अजून उगवायचा होता. इतकाच काय दुधवाले, पेपरवाले यांना पण अजून जाग यायची होती. रस्त्यावर वर्दळ अशी नव्हतीच. कोणीतरी एखादा रिक्षावाला फुर्रर्र करत जात होता. पूर्व द्रुतगती मार्गाला लागलो. इथे मात्र चांगल्या पैकी वर्दळ होती. रात्री कुठून कुठून निघालेले ट्रक, टेम्पो, दुधाचे टँकर आपआपल्या स्थळी जाण्यासाठी धावत होती. मी पण दादर कडे कूच केलं. प्रत्येक पॅडल बरोबर निर्धार पक्का होत होता. या आधी सर्वाधिक ३० कि.मी. गेलेलो. पण आज जवळजवळ ५० कि.मी. चं उद्दिष्ट होतं. पुढे पुढे चाललो होतो... ठाण्याची हद्द संपली. मुलुंडचा चेक नाका मागे गेला. मुलुंड चा सिग्नल, भांडूप पंपिंग स्टेशन गेलं. अंधार अजूनही कायम होता. पुढे तर रस्त्यावर दिवे सुद्धा नव्हते. पूर्ण अंधार. मागून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात चालवत होतो. रस्त्यावर खड्डे नसल्यामुळे फारशी काळजी नव्हती. एक बैलगाडी वाटेत भेटली. सर्योदयापूर्वी जेवढे अंतर कापता येईल तितके चांगले असा त्याचाही उद्देश असावा. पुढे जातच होतो.
माझा ताशी वेग साधारण २० - २५कि.मी./तास असावा. पवईचा सिग्नल गेला. आता हळू हळू उजाडू लागलं होतं. माझ्यासारखेच अनेक उत्साही morning walk करायला निघालेले. कोणी नमस्कार घालत होतं, कोणी हात हलवत होते, कोणी मोठ्या निर्धाराने वजन कमी करण्यासाठी brisk walk घेत होते. विक्रोळीला गोदरेजच्या पुढे आलो. ३-४ मुलं पाठीवर बॅगा घेऊन ट्रेक ला वगैरे जायच्या तयारीत निघाले होते. एकूण काय गुढी पाडव्याची सुट्टी सगळे (माझ्यासारखेच) सत्कारणी लावत होते.
घाटकोपर डेपोचा फाटा आल. गेल्यावेळी इथपर्यंत आलेलो. तेंव्हा घरी पोचल्यावर वाटलेला कि अजून पुढे गेलो तरी चालल असत. या वेळी मात्र पक्कं होतं. दादर खोदादाद सर्कल पर्यंत जायचं. अजून १०-१५ कि.मी. चा रस्ता होता. मध्ये सायन वगैरे लागणार होतं. बाईक वरून पण दादर ला फारसा गेलो नव्हतो. ऑफिस बी के सी ला होतं त्यामुळे सायन वरूनच परत फिरायचो. आज मात्र पक्कं होतं. दादर. एव्हाना रमाबाई आंबेडकर नगर जात होतं. मागच्या टायर मध्ये हवा कमी आहे कि काय असं वाटला म्हणून थांबलो आणि टायरला हात लावून बघितला. हाय... टायर पंक्चर झाला होता. एव्हाना फक्त साडे सहाच वाजले होते. जवळच एक चहा वाला होता. तिथे थोडी गर्दी होती म्हणून तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं घाटकोपर मध्ये कदाचित मिळेल पंक्चर वाला. सायकल वरून उतरून चालणं भाग होतं. चालायला लागलो. आणि खिसा चाचपला. १०० रुपयाची एक नोट होती. बाईक च्या एका पंक्चर ला ४० रुपये घेतात हे ठाऊक होतं. विचार केला सायकल ला २० रुपये घेतले तरी पाच पंक्चर असली तरी काढता येतील. फक्त पंक्चर काढणारा मिळायला हवा होता. घाटकोपर मध्ये थोडा हिंडलो एक दोन पंक्चर वाल्यांची दुकानं दिसली पण सकाळी सात वाजता ते थोडीच उघडणार होते दुकान. रस्त्यात एका दुधवाल्याला विचारलं, त्यांनी एक सायकल वाला सांगितला जो सकाळी सात वाजता उघडतो. अजून ते दुकान उघडायचं होतं. थोडा वेळ तिथेच रेंगाळलो. मागच्या बिल्डींग मधून एक गुजराती नवरा-बायको बाहेर आले. बहुदा मॉर्निंग वॉक घ्यायला चालले असावेत. त्यांना हटकलं तेव्हा त्यांनी कुठल्याश्या गणपती मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पंक्चर वाला आहे असा सांगितलं आणि त्याच दिशेनी पुढे गेले. मी हि माझी मार्गक्रमणा चालू केली. जेमतेम २ मिनिटं झाली असतील, तर तेवढ्यात एक गाडी उलट्या दिशेनी आली, तेच गुजराती नवरा बायको होते... त्यांनी confirm केलं कि इथे दोन मिनिटांवर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला एक पंक्चरवाला चालू आहे. त्यांचे आभार मानले आणि तसाच त्या पंक्चरवाल्याकडे गेलो. वेळ साधारण ६:५०. त्याच्या जवळ पोचलो आणि त्याला सांगितलं पंक्चर काढायला. त्यानी साफ नकार दिला. तो म्हणाला कि तो फक्त बाईकचे आणि कारचे पंक्चर काढतो. त्याची बरीच मिनतवारी केली पण छे, तो काही मानायला तयार नव्हता. शेवटी उठलो. एव्हाना सात पण वाजलेले, म्हटलं बघूया त्या मागच्या सायकलवाल्याकडे उघडला असेल तर... नाहीतर थांबू... सातचा सव्वा सात पर्यंत तरी येईलच की. पण तो वेळेचा पक्का होता. त्याच्या कडे साकडं घातलं. पण तो काही नवसाला पावणारा नव्हता. त्याचाकाडचा पंक्चर काढणारा आला नव्हता. तो यायचा होता नऊ वाजता. मग काय धोंडो भिकाजी जोशींनी पार्ल्याचा मावशीचं बंद घर शोधलं तशी बरीच बंद पंक्चरची दुकानं मी घाटकोपर मध्ये शोधली. मधे मधे अनेक दुधवाले, सायकल चालवणारी मुले यांची बंद दुकानं शोधायला मदत मिळाली.
एव्हाना साडे आठ वाजले होते. सकाळी खाल्लेला भात कुठच्या कुठे गेला होता. पोटात कावळ्याच्या शाळेत मधली सुट्टी झाली असल्यामुळे त्यानी कल्लोळ मांडला होता. मधे मधे आता रस्त्यावरून जाताना बरेच खायचे joints लागत होते. पण खिशात फक्त शंभर रुपये होते. ट्यूब बदलावी लागली तर किती खर्च येईल याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे पंक्चर वाला मिळण्याची वात पाहत होतो. परत त्या मागच्या पंक्चरवाल्याकडे परतलो, त्याचा तो पंक्चरवाला नवाला आला. त्यानी टायर उघडला, त्या ट्यूब मध्ये एकाच पंक्चर होतं, माझ्या खिशात नव्वद रुपये बाकी ठेऊन मी क्षुधा शांती साठी शोध घ्यायला चालू केला.
घाटकोपर स्टेशन जवळ एका कोपारयाशी एक इडलीवाला भेटला, त्याचाकडे तीन-चार इडल्या खाल्ल्या आणि परतीच्या प्रवासाला लागलो. पंतनगर मधून घाटकोपर डेपोमार्गे परत हायवेला लागलो. एव्हाना सूर्य बराच वर आला होता. जवळजवळ साडे नऊ वाजले असतील. परत rhythm आला. झप झप पॅडल मारू लागलो. विक्रोळी चा सिग्नल गेला. परत एकदा हवा कमी झाल्ये की काय अशी शंका आली म्हणून हात लावून पहिला तर शंका खरी ठरली. मागचा टायर पुन्हा एकदा पंक्चर झाला होता. पाण्याचा एक घोट घेतला आणि पुन्हा एकदा पंक्चरच्या दुकानाचा शोध चालू झाला. नशिबानं लवकरच एक पंक्चरचं दुकान मिळाला आणि साधारण १५ मिनिटात परत प्रवास चालू झाला. शेवटी साडे दहाला खिशात ६४ रुपये, बाटलीत पाव लिटर पाणी, भिजलेला टी-शर्ट आणि पोटात प्रचंड भूक घेऊन घरी आलो.
प्रवास चालू केला तेव्हा ठरवलं होता दादरला जायचं. दादरला तर नाही जाऊ शकलो, पण या प्रवासानी एक आत्मविश्वास दिला की, मी दादरपर्यंत जाऊन परत नक्की येऊ शकीन, कदाचित न थांबताही.