Sunday, November 20, 2011

बासुंदी

दोन आठवड्यांपूर्वी "स्वाद" मध्ये दुपारचे जेवायला गेलो होतो. एकूण ब्राम्हणी पद्धतीचे जेवण मिळण्याचे ठाण्यातील स्वाद हे एक उत्तम थाळी restaurant आहे. जेवण मस्त होते. त्यामुळे मग ते आणखी उत्तम करण्यासाठी तिथल्या वेटरला विचारलं, गोड काय आहे म्हणून. तो म्हणाला, "श्रीखंडे, खरवसे, बासुंदीए." श्रीखंड दोन आठवड्यांपूर्वी चितळ्यांचं खाल्यामुळे नको म्हटलं , खरवसही गेल्याच रविवारी इथेच खाल्ल्यामुळे नको म्हटलं. म्हणजे इथे खरवस वाईट मिळतो असं नव्हे. म्हणजे in fact स्वादमध्ये मी आत्तापर्यंत खाल्लेला सर्वात चांगला खरवस होता. पण म्हणून दर वेळेला खरवस थोडीच खाणार. म्हणून मग बासुंदी आणायला सांगितली. पण कसचं काय... मी expect केलेलं कि मस्त सायटलेली घट्ट बासुंदी मिळेल म्हणून. पण छे. ही तर एकदम पातळ होती. माझा अगदीच विरस झाला. तसेच पैसे देऊन घरी आलो.

गेल्या आठवड्यात मित्राच्या लग्नाला गेलेलो. बघतो तर काय जेवायला सीताफळ बासुंदी. मी खुश. आधीच्या आठवड्यात चांगली बासुंदी खायला नाही मिळाली तर काय झालं. आता मस्त बासुंदी खायची. Buffet च्या रांगेत उभा राहिलो तेव्हाच एक वाटी बासुंदीसाठी रिझर्व ठेवली. सगळं घेतलं. एक चांगली उभं राहण्यासाठी जागा शोधली, चमचा बासुंदीच्या वाटीत घातला, चमच्याला काहीतरी घट्ट लागलं. मी आनंदलो. एक आठवड्यापासून जशी बासुंदी खायची होती तशी बासुंदी वाटत होती. एकदा चमचा ढवळून त्या घट्ट बासुंदीचा चमच्याला आस्वाद घेऊ दिला. मग चमचा ओतप्रोत भरला आणि तोंडात घातला. भ्रमनिरास. त्यात जे घट्ट दिसत होतं, ते सीताफळ होतं. बासुंदी तशीच काहीशी पातळ होती. चांगली बासुंदी खाण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली.

आज सकाळी आईचा फोन आला. तिला विचारलं कशी करायची बासुंदी ते. कृती तर खुपच सोपी वाटली. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची होती ती म्हणजे दुध उतू जाऊ द्यायचं नाही. बस... पण ती कृती प्रत्यक्षात येणं म्हणजे त्या कृतीला नचिकेत नामक एका आत्यंतिक आळशी माणसाच्या आळसाला शह द्यायचा होता. त्या कृतीला सुद्धा ते माहित होतं. म्हणून मग दुपारी तुडूंब जेवलो. येस बॉस मध्ये पान खाल्लं. आणि घरी येऊन रविवार दुपार जशी सत्कारणी लावायला हवी तशी लावली. २ तास मस्त झोप झाल्यावर उठलो. डोक्यात बासुंदी अजून ताजी होती. उठलो आणि दुध आणायला गेलो. दुध आणू आटवत ठेवले. सकाळी वाटलं त्याही पेक्षा सोपी वाटली कृती. १ लिटर दुधाची जेमतेम ३००-४०० ml बासुंदी केली. त्यात मस्त वेलची आणि केशर घातलं वरून बदाम किसून घातले. आणि इतके दिवस जी बासुंदी मी पीत होती... ती बासुंदी मी आज "खाल्ली". जीवाला धन्य वाटलं. पुन्हा असं काही वाटायची वाट बघत आता परत आळसाचं अधिराज्य पुन्हा चालू झालं.