Tuesday, April 19, 2011

पुणे प्रवास

गेल्या आठवड्याच्या शेवटी पुण्याला जायचा योग आला... शुक्रवारी संध्याकाळी ठरवलं कि उद्या जायचं... गुरुवारी बँक हॉलिडे, आणि मग शनिवार रविवार त्यामुळे बरेच जण आधीच आधीच सुट्टीसाठी घरी किंवा बाहेर फिरायला गेलेले... जे गुरुवारी गेले नाहीत ते शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी जायला निघाले... माझा प्लान तसा उशीराच ठरल्यामुळे गाडीचं रिझर्वेशन मिळणं अशक्यच होतं. इंद्रायणी, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी सगळ्याचं गाड्या फुल होत्या... मग irctc ला log in केलं, एक मनमाड-पुणे गाडी दिसली... म्हटलं वेळ जास्त जाईल पण जायला तरी मिळेल... त्यातपण विचार केला कि कल्याणला बसायला जायच्या ऐवजी कर्जतला जाऊ, म्हणजे वेळ पण वाचेल... गाडी ८ वाजता कल्याणला आणि १० वाजता कर्जतला येते, म्हटलं ८ - ८:३० पर्यंत जरी निघालो तरी कर्जतला वेळेवर गाडी पकडू शकू... तिकीट काढायला ३० मिनिटे... म्हणजे ७:३०... म्हणजे घरातून निघायचं ७ – ७:१५ ला... असं विचार करून झोपलो.
सकाळी ६:१५ ला उठलो. आवरलं. सात वाजताच तयार झालो आणि निघालो... स्टेशन वर पोचलो तेव्हा ७:०५ वाजलेले... तिकीट काढायला काहीच रांग नव्हती... ७:१२ ला तिकीट हातात होतं... पफलाटावर गेलो तर इंटरसिटी जायची होती... सामान्य डब्याच्या जागी उभा राहिलो... म्हटलं बघू, मिळालं चढायला तर जाऊ याच गाडीनी... कशाला गाडी वगैरे बदलायची... ठाण्याहून कर्जत मग तिथून लोणावळा / पुणे... एकदमच जाता येईल. गाडी आली. गाडीत दुसरा किंवा तिसरा चढलो. बसायला वगैरे नाही मिळालं पण नीट उभं राहायला मिळालं. अजून काय हवा असतं एखाद्याला. गाणी भांडणं ऐकत प्रवास छान झाला.
१०:३० ला पुण्याला पोचलो. या वेळी ठरवलेलं कि रिक्षाला पाय लावायचा नाही. म्हणून बस डेपो शोधात फिरलो. अमितनी सांगितल्याप्रमाणे विजय सेल्स च्या मागे असलेल्या बस डेपो मध्ये गेलो. पाचेक मिनिटात संभाजी नगरची बस आली ती पकडली आणि घरी गेलो. घर वाकडेवाडीला असल्यामुळे जवळ पास खायाची काही दुकानं नाहीत... म्हणून सामान टाकलं आणि उदरभरणासाठी हॉटेलच्या शोधात निघालो... एव्हाना ११:३० झालेले... बस मधून उतरल्यावर निरा प्यायली असल्यामुळे अजून जिवंत होतो. निरा हे स्वास्थ्यवर्धक थंड पेय आहे, निरा रक्त आणि पचनशक्ती वाढवते, निरा मूत्राशय आणि पोटातील विकार दूर करते, निरा गर्भवती स्त्रियांना लाभदायक आहे, निरा उपवासाला चालते... असे नेहमीचेच बोर्ड वाचून धन्य वाटले. पुण्यात आलो कि निरा प्यायालीच पाहिजे. मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी निरा मिळते, पण मुंबईत पिणे होत नाही. पुण्यात होत इतकच. तर डेक्कनला जाणारी बस पकडली आणि गंधर्वमध्ये न्याहारीसाठी गेलो दुपारी १२ वाजता. न्याहारी आणि जेवण एकदमच केलं. तिथून माळवाडीची बस पकडली आणि कोथरुडला गेलो. तिकडचं काम उरकलं आणि दीड – पावणे दोनच्या सुमारास मोकळा झालो. आता प्रश्न होता काय करावे हा. उकडत तर जाम होतं मग स्वातंत्र्य चौकापासून ते सिटी प्राईड कोथरूडला गेलो. thank you आणि फालतू अशा दोन चित्रपटांचा पर्याय होते. मी thank you निवडला. शो सुरु व्हायला अजून तास होता. बाहेर एकट्यानी उन्हात थांबून काय करणार म्हणून आत गेलो. आतला ए सी चांगला होता. बसायला जागा पण छान होती. एक मस्त गुबगुबीत सोफा. एकदम ICICI BKC च्या लायब्ररीतील सोफा आठवला आणि त्याचा योग्य (?) उपयोग करणारे आठवले आणि त्या सोफ्यावर बसलो. गुबगुबीत सोफा. गार ए सी ची हवा. जेवण छान झालेलं. उन्हातून दीड एक किलोमीटर चालणं झालेलं. आणि पिक्चर सुरु व्हयला अजून तास. सकाळी निघायचं त्यामुळे उठलेला लवकर. सोफ्यावर बसलो आणि काय... त्या सोफ्याच अत्यंत योग्य असा उपयोग झाला. की मस्त झोप लागली. अहाहा... शांत... पिक्चर बघायला एकदम ताजातवाना झालो... १६० रुपये वसूल करायचे होते... त्यातले काही त्या सोफ्यानी करून दिले. आता आत जायचं आणि मस्त पिक्चर बघायचा. ‘Thank You’. आत गेलो. अजून राष्ट्रगीत चालू व्हायचं होतं. जाहिराती झाल्या आणि राष्ट्रगीत चालू झालं. राष्ट्रगीताचा इथला video चांगला आहे. सैन्याच्या बिगुलवर (बिगुलच बहुतेक तरी) राष्ट्रगीत वाजता आणि समोर बर्फाळ हिमालयात आपले सैनिक राष्ट्रगीतसाठी सावधान उभे आहेत. राष्ट्रगीत संपलं. आणि पिक्चर सुरु झाला. सुनील शेट्टी, अक्षय कुमार, सोनम कपूर, धर्मेंद्रचा कोण तो मुलगा आणि हो तो इरफान खान (तोच थोडा बेअरेबल आहे) आणि २-३-४-५ बायका. पहिल्या १० मिनिटात कळलं कि पिक्चरला येऊन चूक केली. पण आपण पडलो चुकांना दुसरा चान्स देणारे. वाटलं थोड्या वेळानी चित्रपट काहीतरी कलाटणी घेईल. आता घेईल मग घेईल. पण छे. सगळा वेळ तसाच थंड, रटाळ असा तो पिक्चर कसा तरी मध्यंतरापर्यंत आला. थेटर मधले सगळेच कंटाळलेले दिसत होते. पिक्चरला नाव ठेवत होते. मी एकटाच होतो, त्यामुळे मीही मनातल्यामनात पिक्चरला आणि मग मी ‘हाच’ पिक्चर का बघायला आलो म्हणून स्वतःला नावं ठेवली. मध्यांतर संपला. आणि पुढचा रटाळ आणि उत्तरोत्तर अधिकच कंटाळवाणा होत गेलेला पिक्चर पहिला. घर जवळ असतं आणि उकाडा कमी असता तर मी नक्कीच घरी जाणं पसंत केलं असतं. नक्कीच शंकाच नाही. कोण त्या सुनील शेट्टीचा अभिनय (?) पाहणार.
बाहेर पडलो. उन कमी झालं होतं. थोडसं ढगाळ वातावरण होतं. वाटत होता पाऊस येणार बहुतेक. असं विचार मनात येतो ना येतो तोच पावसाचे मोठ्ठे मोठ्ठे थेंब पडायला लागले. तरी पुणेकर शांत होते. कुठे धावपळ नाही. कुठे घाई नाही. मलाच कसातरी व्हायला लागलं. पाऊस मोठा आला तर जवळ आसरा शोधात शोधात जात होतो. रिक्षा तर करायची नव्हती. आणि बस कुठे थांबेल माहित नव्हतं. तसाच चालत राहिलो. मातीचा मस्त वास सुटला होता. एकदम फ्रेश वाटलं. पिक्चर बघितल्याचा सगळा शीण क्षणार्धात नाहीसा झाला. वाटलं चालतच राहावं. चालाताच राहावं. म्हणून चालतच डेक्कन कडे कूच केलं. सिटी प्राईड ते डेक्कन हे अंतर तसं काही जवळ नाही. चालत जायला तर मुळीच नाही. तीन एक किलोमीटर तरी नक्कीच असेल. मधेच पाऊस थोडा मोठा झालं म्हणून आडोशाला थांबलो. आणि मग परत पुढे चालू लागलो.
चालताना विचार आला, पुण्यातले रस्ते किती रुंद आहेत. फुटपाथ पण रुंद आहेत आणि चालायच्या लायकीचे पण आहेत. इतकेच नव्हे तर पुणेकर त्या फुटपाथवर चालत पण आहेत. फारच थोड्या दुकानांनी फुटपाथवर अतिक्रमण केलय. बरं वाटलं. मध्ये एका ठिकाणी उसाचा रास प्यायलो. FC रोड ला सब वे झालय मन मित् च्या बाजूला तिथे नाश्ता कम रात्रीचं जेवण असं एकदम केलं. अन पुढच्या प्रवासला लागलो. अजून जवळपास दोन अडीच किलोमीटर जायचं होतं. पण गेलो. पाय दुखायला लागले होते. म्हणून घरातली कामं आटपून लवकर झोपलो. उद्या दुपारी निघायचा विचार होता. आरामात उठून निघायचं. दिवस भर झालेली दमणूक, त्यामुळे दुखत असलेले पाय. यामुळे झोप छान लागली.
सकाळी ६ ला एकदम जाग आली. एकदम फ्रेश वाटत होतं. हवेल किंचितसा गारवा होता. पंखा बंद असला तरी चालत होता. तसाच उठलो आणि आवरलं. आणि परत काहीतरी टाईम पास करण्यापेक्षा आत्ताच निघायचं नक्की केलं. घर बंद केलं. आणि स्वारगेटला आलो. अजून रविवारची परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी सुरु व्हायची होती. पुणे-ठाणे-वसई गाडी मिळाली. मस्त विंडो सीट मिळाली. मस्त डुलक्या देत घरी आली. डुलक्या कसल्या झोपा काढत हा शब्दप्रयोग जास्त योग्य आहे मी जसा आलो त्याला.
एका दिवसाचा प्रवास छान झाला. नेहमी स्वतःच्या वाहनाने जाणारा मी आज पब्लिक ट्रान्सपोर्टनी गेलो. बरं वाटलं. नेहमीपेक्षा श्रम जास्त झाले, पण खर्च ही कमी झाला. नेहमी फिरायला जाताना स्वतःचे वाहन नसले तरी तेवढीच मजा येते हे कळलं. आणि मधून मधून असं ही प्रवास करायला हवा ही जाणीव झाली. पुढचा असा प्रवास कधी करीन माहित नाही पण नक्की करीन हे नक्की झालं.