Sunday, May 1, 2011

नाऱ्या

नारायण रोजच्या सारखा नऊ वाजले तरी उठला नव्हता. शाळेतून मास्तरांनी कधीच काढून टाकलेलं त्यामुळे सकाळी उठण्याची काहीच घाई नव्हती. आईनी पाठीत सोटा घातला आणि एक अर्वाच्य शिवी देऊन कमरेत लाथ घातली आणि नारायणाला उठवला. आज आपल्याला लवकर का उठवलं हा विचार करत नारायण डोळे चोळत चोळत उठला. आणि तोंडात ब्रश घालून डुलक्या घेत घेत गाईच्या शेपट्या पिरगळीत उभा होता. आईची नारायणाच्या मागे घाई चालूच होती. आता परत पाठीत एक दणका मिळेल कि काय या भीतीने नारायण पटापट आवरायला लागला. आंघोळ केली. मग आईनी त्याचा भांग पडला. आज आईचं हे असं का चाललय हे काही नार्याला अजून कळत नव्हतं. आईनी पण मग घरातलं आवरलं. नाऱ्याचा बाप शेतावर लवकर जात असल्यामुळे आईचा स्वयंपाक वगैरे नाऱ्या उठायच्या आधीच झाला होता. आईनी पण मग आपलं पण आवरलं, साडी वगैरे नीट केली आणि नाऱ्याला घेऊन चालायला लागली. नवीन शाळेत आज नाऱ्याचं नाव घालायचं होतं. नाऱ्या तसा हुशार होता. पण मस्ती करणे, अभ्यास न करणे, थापा मारणे अशा वाईट सवयीही नाऱ्याला होत्या. नवीन शाळेतील मास्तरांनी नाऱ्याचं नाव वगैरे नाऱ्याला विचारलं आणि शाळेत सातवीच्या वर्गात टाकलं. नाऱ्या मस्तीखोर आहे, मुलींच्या वेण्या ओढणे, मुलांना बदडणे, शिक्षकांच्या धोतरावर पेनातली शाई शिंपडणे असले नाऱ्याचे उद्योग आईनी आधीच मास्तरांना सांगितले होते. त्यामुळे मास्तरही सावध होते. मास्तरांनी दुसऱ्या दिवशी पासून नाऱ्याला शाळेत यायला सांगितले. नाऱ्याला आपल्याला आईने न सांगता शाळेत नेले आणि आपले नाव नोंदवले हे अजिबात पसंत पडले नव्हते. नाऱ्या पाय आपटतच घरापर्यंत आला. आणि घरी तर त्याने आकांड पांडवाच सुरु केले. पण आईनी पूर्ण तयारी केली होती. जेवायला आज नाऱ्याच्या आवडीचे श्रीखंड तयार होते. श्रीखंडाचे नाव काढल्यावर मात्र नाऱ्याने आपला राग आवरला आणि शांतपणे जेवायला बसला. पण अजूनही त्याच्या डोक्यात थोडा का होईना राग होताच. नाऱ्या तसा गप्प बसणाऱ्यातला तर नक्कीच नव्हता. पण समोर श्रीखंड पाहून नाऱ्या आधी राग आणि मग श्रीखंड गिळलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ची शाळा होती. त्यामुळे दमून आलेल्या बाबांशी थोड्या गप्पा मारून नाऱ्या लवकर झोपला. डोक्यात उद्याचे शाळेचे विचार होते. बराच वेळ नार्याला झोपच लागली नाही. आणि मग रात्री कधी झोप लागली ते कळलच नाही. सकाळी उठून नाऱ्यानी पटापट दात घासले. रात्री जागा असताना नाऱ्या शांत झोपला नव्हता. काहीतरी विचार करत होता. एकदा शाळेतून बाहेर काढलेलं असल्यामुळे अशी वेळ परत येऊ नये म्हणून काहीतरी प्लान त्याच्या डोक्यात शिजत होता. आणि म्हणूनच आज नाऱ्या पटापट आवरत होता. नाऱ्याला पटापट आवरताना आई बघत होती, आश्चर्य तर तिलाही वाटत होतं. पण आवरतोय ना चांगलं आहे, असं विचार करून तीही गप्पा बसली.
नाऱ्यानी सायकल वर टांग मारली आणि शाळेकडे जायला लागला. सायकल वरून जाताना पण मधेच कोणाला टपलीत काय मार, मधेच रस्त्यात निवांत आडव्या झोपलेल्या कुत्र्याचा अंगावर सायकल घाल आणि मग त्याला पिटाळूनच काय लाव असले उपद्व्याप चालूच होते. नाऱ्याचा आज सातवीच्या वर्गातला पहिला दिवस होता, मास्तरांनी नाऱ्याला आपली ओळख बाकी मुलांना करून द्यायला सांगितली. नाऱ्या रात्रभर याचाच तर विचार करत होता. नाऱ्यानी आपले नाव वगैरे सांगितलं आणि आपण खूप शक्तिवान असल्याचं पण आख्या वर्गाला सांगितलं. मास्तरांना ते खुपलं पण उगाच पहिल्या दिवशी बाहेर काढायला नको म्हणून ते पण गप्पा बसले. आणि त्यांनी पोरांना गणित शिकवायला घेतले.
नाऱ्याचा शाळेतला पहिला दिवस तर उत्तम गेला. हळू हळू नाऱ्यानी सगळ्या मुलांना आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. कुठे कोणाचं भांडण झालं तर ते सोडव, किंवा त्यात मध्यस्थी कर, किंवा मध्ये पडून दोघांना चोप दे. आधीच्या शाळेत बरेचदा नापास झाल्यामुळे नाऱ्या बाकीच्या मुलांपेक्षा वर्गात मोठा होता त्यामुळे बाकी मुलं पण नाऱ्याला मान द्यायची. एकदा मास्तरांनी मुलांना पेपर दिला आणि त्यांना विडी प्यायची लहर आली म्हणून त्यांनी नाऱ्याला वर्गावर लक्ष ठेवायला सांगितलं. मग नाऱ्या मास्तरांवर रोज लक्ष ठेऊ लागला. नाऱ्याला हळू हळू मास्तरांची विडी पिण्याची, दुसऱ्या एका मास्तरांची तपकीर ओढण्याची आणि हेडमास्तरांची मधेच दारू पिण्याची सवय कळली. जस जशा नाऱ्याला या सवयी काळात होत्या तस तशी नाऱ्याची शैक्षणिक प्रगती जोमाने (?) चालू झाली. नाऱ्याच्या या प्रगतीवर नाऱ्याचे आई बाबा, शेजारी पाजारी जाम खुश होते. नाऱ्यानी आता नाऱ्यानी शेजाऱ्यांची पण कामे सुरु केली.
नारायणाच्या गावात एक मोठा प्रश्न होता. गाव लहान पण लोक फार. आणि त्यातील बरेचसे म्हणजे जवळजवळ ७० टक्के शेतकरी. त्यामुळे नोटा बऱ्याच मळत. या मळलेल्या काळ्या नोटा कोणी घेत नसत. सरकारी कर वगैरे भरायला तर लोक अशा मळलेल्या फाटलेल्या काळ्या झालेल्या नोटा वापारु शकत नव्हते. सरकारी अधिकाऱ्याचं हातात नोट पडायची आणि तो ती खोटी म्हणून आपल्यालाच पकडायचा.... नाऱ्यानी ही गोष्ट ओळखली आणि नोटा धुवायला लागला. हळू हळू शेजाऱ्या पाजार्याना ही गोष्ट कळली. त्यांनी पण आपल्याकडे असलेल्या नोटा नाऱ्याकडे दिल्या. नाऱ्या प्रत्येक नोट वेगळी करायचा. आणि धुवायचा. नोटा जेव्हा मालकाकडे परत जायचा तेंव्हा त्याला त्या ओळखू पण येत नसत इतक्या स्वच्छ. आणि त्याही नीट बंडलात बांधलेल्या. नाऱ्याचं नाव मग हळू हळू गाव भर पसरलं. नाऱ्याचा मान खूप वाढला. लोक नाऱ्याला जादूगार समजू लागले. एवढ्या मळलेल्या नोटा इतक्या स्वच्छ... नाऱ्याची ही कीर्ती हळू हळू इतर गावांतही पसरली. नाऱ्याच्या हातात कलाच तशी होती. गावाचे सरपंच, पाटील, पोलीस अधिकारी सगळे नाऱ्याकडे नोटा धुवायला येऊ लागले. मग नाऱ्यानी आपला पूर्णवेळ व्यवसाय म्हणून हाच धंदा चालू केला. नाऱ्याची उठबस अशा मोठ्या लोकात व्हायला लागल्यामुळे नाऱ्या आता एक गावातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये गणला जाऊ लागला. कोणाला म्हैस घ्यायची असो किंवा गावातील कोणाचं लग्न असो, नाऱ्याला विचारल्याशिवाय काहीच होणं शक्य नव्हतं. या मोठ्या माणसांचे पैसे सांभाळणं हे ही नाऱ्यानी पुढे सुरु केलं आणि मग तर काय विचारता, नाऱ्या प्रतिष्ठित माणसांत पण मानाची जागा पटकावली. नाऱ्याला आता कोणी ‘नाऱ्या’ अशा एकेरी नावानी हाक मारत नव्हतं, तर ‘नारायणराव’ असं आदरानी संबोधत होतं.
तालुक्यात रस्ते कुठे कसे बांधायचे, धरणाचं पाणी कुठे अडवायचं, तिथल्या विस्थापितांनी कुठे जायचं अशा विषयात नाऱ्याचा शब्द आता अंतिम होता. नाऱ्या आता स्वतःला देवाचा अवतार म्हणवत होता. त्याचं कामच तसं होतं. तालुक्यात ५ शाळा, २ कॉलेजं, ३ हॉस्पिटलं, १ धरणं. नाऱ्याचं या मागचं धोरण एकाच होतं. जगात शांती आणि प्रेम नांदावं. सर्व राजकारण्यांशी, बिझनेसमनशी नाऱ्याचे चांगले संबंध होते. पण त्याचं हे असं वर वर चढणं काही लोकांच्या डोळ्यात खुपत होतं. मोठ्या माणसांचे शत्रू कमी थोडेच असतात. नाऱ्याच्या या मोठेपणावर काही लोक जळत होते. त्यातीलच स्वतःला समाजसुधारक म्हणवणारे लोक नाऱ्याच्या विरोधात प्रचार करू लागले. नाऱ्या लोकांना कसा फसवतो, तो जी जादू करतो त्याच्या पाठी विज्ञान कसं आहे हे पटवायचा प्रयत्न करत होते. नाऱ्याच्या भक्तांचा मात्र नाऱ्यावर पक्का विश्वास होता. कारण नाऱ्या हा देवाचा अवतार होता. देश विदेशातून नाऱ्याला देणग्या येत होत्या. आणि त्या देणग्यांमधून लोकांची सेवा करण्याचं नाऱ्याचं कार्य अव्याहतपणे चालू होतं आणि त्यातूनच अनेक भक्त नाऱ्याला मिळत होते. या कामाबरोबरच नाऱ्याचा नोटा धुण्याचा धंदा ही तेजीत चालू होता. आता तर नाऱ्या १८० देशांना नोटा धुवून देत होता. या सर्व देशांतून मग नाऱ्याला नोटा धुवायची कंत्राट मिळत गेली. तिथेही मग हळू हळू त्याचा भक्तगण वाढत गेला. आणि देणग्यांचा ओघ वाढत गेला आणि नाऱ्याच्या कार्याला आणखीन पुढे घेऊन गेला.
नाऱ्या आता म्हातारा व्हायला लागला होता. देवाचा अवतार असूनही आता त्याला व्हीलचेअरवरून जावं लागत होतं. बरचं काही करायची इच्छा होती, पण तब्येत साथ देत नव्हती. अनेक राजकारण्याचा, बिझनेसमनचा पैसा नाऱ्याकडे होता. अनेक नोटा धुण्याची कंत्राट घेतलेली होती. त्याचा हिशोब हे सगळं आता त्याचा मुलासारखा असलेला जितू बघत होता. नाऱ्या नंतर हे कार्य जितूकडून पुढे चालू राहणार म्हणून लोक जितूला नाऱ्याचा उत्तराधिकारी मानू लागले होते. पण अनेकांना जितूचं असं पुढे जनम रुचत नव्हतं.
नारायण आपलं काम आटपून भक्तांना भेटून झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी जितू नारायणाला उठवायला गेला तर काय नारायण सर्व भक्तांना सोडून आपले अवतार कार्य संपवून गेले होते. २ दिवसांनी नारायानावर अंत्यसंस्कार झाले. खरा प्रश्न मग बाहेर आला. अनेकांचे पैसे नारायणाकडे धुवायला आले होते. त्याचा हिशोब जितू कडे होता. पण या गोंधळात ती वही कुठे तरी गायब झालेली. आता मार्ग एकाच होता. प्रत्येकानी आपल्या नोटा ओळखायच्या आणि मग घेऊन जायच्या आणि दुसरीकडे धुवायला द्यायच्या किंवा जितू कडे त्या नोटा राहू द्यायच्या आणि मग धुतायला कि सगळ्या वेगळ्या करून ज्याच्या त्याला द्यायच्या. पण या मोठ्या लोकांचा नाऱ्यावर जेवढा विश्वास होता तितका विश्वास जितूवर नव्हता. त्यांनी जितूला नारायणाच्या खुनाचा कात केल्याच्या आरोपाखाली अडकवलं आणि आपण आपल्या नोटा ओळखण्यासाठी सर्व खजिना बाहेर काढला आणि आपल्या आणि थोड्या दुसऱ्याच्या ही नोटा घेऊन पसार झाले.