Friday, March 18, 2011

च्यामारी...

करलो दुनिया मुट्ठी मे, लाथ मारीन तिथे पाणी काढीन, म्हणणारे आपण निसर्ग जेंव्हा लाथ मारतो तेंव्हा कुठे असतो ते बघायला आपण शिल्लक जरी राहिलो तरी खूप झालं... जपानवर आलेलं संकट हे याचचं द्योतक आहे... आपण २० व्या शतकातून २१ व्या शतकात गेलो... विज्ञानानी खूप प्रगती केली... आपण चंद्रावर पोचलो... चंद्रावर पाणी आहे का नाही ते पाहिलं, मंगळावर गेलो, जगाची उत्पत्ती कशी झाली असावी हे शोधण्यासाठी बरेच अवाढव्य आणि खर्चिक प्रयोग केले... नॅनो टेक्नोलॉजी, बायो टेक्नोलॉजी.... किती तरी शिखरं पार केली... पण जेंव्हा निसर्ग काही शिखरं पार करतो... तेंव्हा आपल्याकडे त्याचाशी लढण्यासाठी हत्यार तर दूर... स्वतःला वाचवायला निवारा शोधायला हि वेळ मिळत नाही. जपानमधील सुनामीमध्ये झालेल्या नुकसानाचे फोटो पाहताना तर हे अगदी प्रकर्षानी जाणवतं. वाहून गेलेलं सामान, गाड्या, विमानं, इतकाच न्हवे तर वाहून गेलेली घरं... च्यामारी... मी घर धुतात हे ऐकलेलं पण घरासकट कोणी गावच्या गाव धुवून नेलेलं मी तरी प्रथमच ऐकलं आणि पहिलं... मागे जहाजांच्या टक्करीत कंटेनर समुद्रात वाहून गेलेले वाचले होते. पण इथे तर रेल्वेच्या रेल्वे वाहून गेल्या आणि जहाजांची तर समुद्रानी काहीच लाज शिल्लक ठेवली नाही... इथे तर आभाळच फाटलं होतं तर टाका तरी कुठे कुठे म्हणून घालणार हो...

त्यानंतर आलेलं संकट तर त्याहूनही अधिक भयानक आणि उग्र होत... ते म्हणजे अणुभट्टीत झालेले स्फोट... अनेक भूकंपाचे धक्के तर रोजच्या जीवनाचा भाग झालेल्या जपानने हिरोशिमा आणि नागासाकीही पचवले... त्यातून शिकलेल्या अनेक धड्यांमुळेच बहुधा जीवित हानी कमी झाली असावी... पण तरीही पुन्हा एकदा रेडीएशनचा त्रास या देशाला तरी द्यायला नको होता... आधीच कूर्मगतीने होणारा जपानचा आर्थिक विकासाचा दर... आणि त्यात हा दर आणखी कमी करणार असलेलं हे संकट म्हणजे जपानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक आव्हान असणार आहे... जपान वाढत नसला तरी ती एक मोठी बाजारपेठ होती... एक उत्पादनाची जागा होती... बंद पडलेली अणुभट्टी... उर्जेची कमतरता... कमी झालेली मागणी... अशा एक दुष्ट चक्रात जपान जगाला घेऊन गेलाय... भूमध्य सागरी क्षेत्रात असलेली आणीबाणीची स्थिती, इजिप्त, ट्युनिशिया, बहारीन मध्ये असलेली नाजूक स्थिती.... जागतिक विकासाच्या समोर एक आर्थिक आव्हान आहे... भारतातील स्थितीसुद्धा काही फार चांगली म्हणावी अशी नाहीये... महागाईचा दर अजूनही वरच आहे... त्यावर चाप बसवायचा म्हणून रिजर्व बँकेने वाढवलेले व्याजाचे दर... त्यामुळे कमी झालेला विकासाचा दर... संकटांची मालिकाच आहे... त्यातच दर पंधरवड्याला बाहेर येणारे घोटाळे... आणि मग त्यावर चालू असलेली किळसवाणी चर्चा... घोटाळे राहिले बाजूला... हा घोटाळा झाला तेंव्हा दुसरा पक्ष कसा सत्तेवर होता आणि त्यांच्याच काळात हा घोटाळा कसा झाला आणि आम्ही असताना कसा फक्त बाहेर आला अशा बतावण्या... डोकं सुन्न होतं... च्यामारी...

No comments:

Post a Comment