Sunday, January 22, 2012

रिक्षाचालकांची मुजोरी का traffic पोलिसांचा नाकर्तेपणा

ठाण्यात रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच करावा लागतो. म्हणजे इथे मी फक्त प्रवास करताना म्हटलंय, कुठल्या वाहनांनी करताय का पायी करताय हा प्रश्न गौण आहे. कारण कसाही प्रवास केलात तरी तुमच्या जीविताला धोका अटळ आहे. आता जगभर कुठेही अपघात होतातच, पण ते कशामुळे झाले ही गोष्ट महत्वाची आहे. रस्त्यावर अपघात होणं, हे जरी स्वाभाविक असलं, तरी अपघात का होतो चुकीमुळे होतो कि हलगर्जीपणामुळे होतो हे महत्वाचं आहे. उद्या जरका कोणी रस्त्याच्या मधून चालला असेल आणि कोणी ठोकलं तर चुकी मधे उभे राहणाऱ्याची. पण जर का कोणी रस्त्याच्या कडेनी चालत असेल आणि त्याला कोणी ठोकलं तर चूक कडेनी चालणाऱ्याची नक्कीच नाही. ज्यांनी ठोकलं त्यांनी का ठोकलं, त्यावेळी रस्त्यावरील बाकी dynamics कसे होते त्यावर जर का ते अवलंबून असेल तर ती चूक म्हणावी लागेल, पण जर का तो दारू पिऊन गाडी चालवत असेल आणि त्याचा गाडीवरील ताबा गेला तर तो गाडीवाल्याचा हलगर्जीपणाच म्हणावा लागेल. आता हा माणूस दारू प्यायला ज्या गुत्त्यावर गेला तिथेच जरका पोलीस गेला असेल, आणि त्याच्या समोर तो दारू पिऊन मग गाडी चालवायला बसत असेल तर मग तो पोलिसाचा नाकर्तेपणा म्हणावा लागेल.
या गोष्टीचा मला आजच अनुभव आला. आणि त्यावरून रिक्षावाले आणि पोलिसांचं साटं-लोटं आहे कि काय असा संशयही येतो. काल ऑफिस मधून संध्याकाळी घरी जाताना नेहमीप्रमाणे राम-मारुती रोडने येत होतो. नेहमीप्रमाणे रिक्षावाले उलट्या बाजूनी येत होते. त्यांच्यावर ओरडलो. पुढे आल्यावर कोपऱ्यावर एक पोलीस हवालदार दिसला बरेच दिवस मनात होतं, म्हणून त्याला विचारलं, काय हो राम-मारुती रोड अजूनही वन-वे आहे का? तो म्हणाला आहे. मी विचारलं मग तो रिक्षावाला तुम्ही इथे उभे असताना उलट दिशेनी कसा काय आला? त्यावर तो म्हणाला, साहेब असा अडवायचा प्रयत्न करणाऱ्या दोन हवालदारांना रिक्षावाल्यांनी आत्तापर्यंत उडवलय. रिक्षावाले, बाईकवाले जोरात येतात आणि पोलिसांना न जुमानता उलट्या दिशेनी निघून जातात. आमचा पगार तो किती, त्यात काय हात पाय मोडला तर त्याचा खर्च कसा काय करणार आणि घर कसं चालवणार. आपल्याला झेपेल तेवढा काम जीव सांभाळून करायचं बाकी सोडून द्यायचं. म्हणजे तसा काही अपघात वगैरे झाला तर त्याची तक्रार वगैरे आम्ही नोंदवून घेतो की. मी कपाळाला हात लावून घरी परत आलो. पण तेव्हा मला हे माहित नव्हतं की दुसऱ्याच दिवशी १२ तासांच्या आत तक्रार नोंदवण्याची पाळी माझ्याच मित्रावर येणार आहे.
काल रात्री ऑफिसहून घरी येताना माझं पोलिसाबरोबर बोलणं झालं आणि आज सकाळी ऑफिसला जाताना माझ्या मित्राचा अपघात झाला. एका उलट बाजूनी येणाऱ्या रिक्षावाल्यांनी त्याला राम-मारुती रोड वर ठोकलं. यात आता हलगर्जीपणा कोणाचा? रिक्षावाल्याचा? का पोलिसांचा? या अपघाताची जबाबदारी पोलीस घेणार काय? पोलिसाच जर काम असेल traffic regulate करणं आणि त्याकामात जर का तो नालायक ठरत असेल तर मग सामान्य नागरिकांनी बघायचं कोणाकडे. पोलीस जर का फक्त मूक निषेध नोंदवणाऱ्यावर लाठी हल्ला करून त्यात मर्दुमकी मानणार असतील तर मग पोलिसाला षंढच म्हणावं लागेल.
रिक्षावाल्यांची मुजोरी तर ठाण्यासाठी नवीन नाही. मीटरमध्ये फेरफार करणं, जवळची भाडी नाकारणं, रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभी करणं, रिक्षात तीनच्या ऐवजी चार प्रवासी घेणं या नित्याच्याच गोष्टी होत्या, ज्या ठाणेकरांनी आधीच accept केल्या होत्या. आता या रिक्षावाल्यांची मुजोरी एवढी वाढली आहे, की पोलिसांना पण ते जुमानत नाहीत. निदान माझ्या कालच्या पोलीसाबरोबरच्या बोलण्यावरून तरी तसेच म्हणावे लागेल. किंवा मग पोलीस नाकर्ते असचं म्हणावं लागेल. पोलीस नाकर्ते आधी का रिक्षावाले मुजोर आधी. कोंबडी आधी का अंडं?

2 comments:

  1. ठाण्यात रस्त्यावरून प्रवास करताना हात मुठीत धरूनच करावा लागतो.
    ....
    "हात मुठीत " नाही रे "जीव मुठीत"..

    ReplyDelete
  2. धन्यवाद Birju... चूक सुधारली...

    ReplyDelete